Tuesday, December 1, 2009

प्रेम म्हणजे काय असते ?

प्रेम म्हणजे काय असतं ?………..
प्रेम म्हणजे असतो
एकच श्वास दोघांसाठी…..

प्रेम म्हणजे असतो
एकच विश्वास, कधीही न संपणारा…

प्रेम म्हणजे असते
एकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे….

प्रेमात नसावी काही
मिळव्ण्याची भाषा……..

प्रेमात असावी एकच अभिलाषा……
न बोललेले शब्द ऎकायची…..

प्रेमात नसावे रुसवे फ़ूगवे
असावा फ़क्त आनंदी आनंद गडे……….
इकडे तिकडे चोहीकडे……..

एकदा तरी प्रेम जरुर करावे
पण ते आंधळे नसावे………..

कोणी तरी बोललेच आहे
“प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं same असतं”…………..

प्राणायाम- का व कशासाठी?


भारतीय ऋषिमुनींनी संस्कृतीचं महत्त्व भारतीयांच्या मनावर बिंबवलं. मानवाच्या आंतरिक शक्तीचा विकास होणं गरजेचं आहे,अन हा विकास मानवी शरीराच्या विकासातून होऊ शकतो, हे त्यांना जाणवलं होतं. त्यामुळेच खाण्याच्या, विश्राम करण्याच्या तसेच शरीराचं निकोपत्व कायम ठेवण्याच्या अनेक पद्धतींचा त्यांनी शोध लावला होता. अनेक वर्षाच्या अथक प्रयत्नांतून अन शोधांतून त्यांनी मानवी शरीराची व मनाची ताकद, सकसता अन पावित्र्य वाढविण्यासाठी कसरत व योगाच्या विशेष पध्दतींचा विकास केला होता. ऋषीमुनींनी स्पष्ट केलं की आपण देवाला प्राणायमाने प्राप्त करुं शकतो. कारण या अवस्थेत बुध्दी विचारांना शरण जाते, कुठलीही विघ्ने न येता आपण प्राणायमाने चित्त स्थिर करु शकतो, इथं आपल्या ऐच्छिकाशी, देवाशी तादाम्य पावण्याची स्थिती असते. सुर्याच्या तीन अवस्थांशी याचं देणं घेणं चालतं. सकाळी उठताना उगवत्या सुर्याची पूजा, जी दिवसाची कामे करायला प्रेरणा देते. दुपारचा सूर्य जेवणाने आपली शक्ती वाढवून काम करायला ताकद देतो तर संध्याकाळचा मावळता सूर्य म्हणजे त्या सर्व शक्तिमान परमेश्वराची कृपा, त्याचे आभार, कारण त्यानेच दिवसाची सर्व कामे पूर्ण केली. ऋषिमुनींच्या मते पहाटे तीन ब्रम्हमुहूर्त असतो, ज्यावेळी प्रकृती आपल्या सर्वोत्तम पावित्र्यात असते, प्राणायमासाठी ही उत्क्रुष्ट वेळ आहे.

महाराष्ट्राचे मानबिंदू – छत्रपती शिवाजी महाराज


शिवकाळात स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे समर्थ रामदास यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे महानतम व युगप्रवर्तक असे व्यक्तिमत्त्व उपरोक्त परिपूर्ण, आशयघन व वजनदार अशा शब्दांत तोलले आहे.

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. सुमारे ३०० वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात, गुलामगिरीत खितपत पडला होता. दिल्लीचे मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांच्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडली जात होती. साम्राज्यवादाने झपाटलेल्या सुलतानी आक्रमणांमुळे इथली घरे-दारे, पीक-पाणी, बायका-पोरी सुरक्षित नव्हत्या. याच काळात शहाजीराजे भोसले व जिजामाता यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी, १६३० रोजी, (संदर्भ : श्री राजा शिवछत्रपती, गजानन मेहेंदळे, डायमंड पब्लिकेशन्स) पुणे जिल्ह्यातील, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. वडिलांचा जाहगिरीचा प्रदेश बंगळूरचा (कर्नाटक) असल्यामुळे शिवबांची जडण-घडण त्यांच्या आई जिजाबाईंच्या सहवासात व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली. रामायण, महाभारत या गोष्टींचे शिवबांवर लहानपणापासून संस्कार झाले. या गोष्टींच्याच माध्यमातून त्यांची स्वराज्य प्रेरणा जिजाबाईंनी जागृत केली. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र यांचा अभ्यास त्यांनी लहानपणीपासून मोठ्या कुशलतेने केला. त्याचबरोबर लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी याबाबतीतही शिवबा पारंगत झाले.

मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर त्या जाहगिरीचा ताबा जिजाबाईंनी घेतला. जिजाबाईंनी त्याच ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवून, लोकांना एकत्र करून पुन्हा पुणे हे गाव वसवलं. याच काळात जाहगिरीच्या कारभाराच्या निमित्ताने शिवाजी राजांचा संबंध इथल्या १२ मावळांमध्ये आला. या ठिकाणीच त्यांना प्रथम बालमित्र व नंतर स्वराज्याचे शिलेदार मिळाले. या काळातच त्यांचे नेतृत्वगुणही फुलायला लागले. एका स्त्रीवर अत्याचार करणार्‍या एका गावाच्या पाटलाला त्यांनी हात-पाय तोडण्याची शिक्षा याच काळात सुनावली. आपल्या दक्ष न्यायव्यवस्थेचे उदाहरण रयतेसमोर ठेवले व स्वराज्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्यास ते समर्थ असल्याचेही सिद्ध केले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी रायरेश्र्वराच्या पठारावर शिवलिंगाला स्वत:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. या वेळी सोबत त्यांचे जिवाभावाचे सवंगडी-मावळे होतेच. तोरणा जिंकून त्यांनी जणू स्वराज्य स्थापनेचे तोरणच बांधले. तोरण्यानंतर पुरंदर काबीज करणे, फत्तेखानाबरोबरची लढाई यामुळे शिवरायांचा आत्मविश्र्वास व निर्धार या दोन्ही गोष्टी वाढत गेल्या. पण त्यांची खरी परीक्षा झाली ती शहाजीराजांना कैद झाली त्या वेळी! शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्राचा उपयोग करून, दिल्लीच्या बादशाहकरवी आदिलशाहवर दबाव आणून त्यांनी आपल्या मुत्सद्दी राजकारणाचे दर्शन घडवले.

त्यानंतरच्या काळात अफझलखानाच्या रूपाने महाराष्ट्रावर खूप मोठे संकट आले. हजारो गावे खानाच्या सैन्याने जाळली, हजारो मंदिरं नष्ट केली आणि रयतेवरही खूप अन्याय केले. पण महाराजांनी न घाबरता, न डगमगता त्याचा सामना करण्याचे ठरवले. स्वराज्याचे आपण पालक आहोत ही भावना प्रबळ होत गेली. त्यातच कान्होजी जेधे व इतर अनेक सरदारांनी केलेला त्याग व पराक्रम यातून कृतज्ञतेची आणि जबाबदारीची भावना प्रबळ होत गेली. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून इतिहासात नवा अध्याय लिहिला. ‘अफझलखान चाल करून आला, त्याला महाराजांनी शिताफीने प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला बोलावले आणि धाडसाने खानाला संपवले.’ – या वाक्यांमध्ये महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा, अभ्यासकांना आश्र्चर्य वाटेल असा आणि आजही मार्गदर्शक ठरेल असा मोठा इतिहास सामावलेला आहे. खानाला भेटतानाचा गणवेश, खानाचा देह (उंची, जाडी), स्वत:ची उंची, `काय झाल्यास काय करायचे’ याच्या पर्यायांचा अभ्यास, सोबतीच्या माणसांची निवड, खानाचा खात्मा केल्यानंतर त्याच्या सैन्याचा पराभव करण्यासाठीचे नियोजन, त्यासाठीचा गनिमी कावा, मोहीम अयशस्वी झाली अन्‌ खुद्द शिवरायांना दगाफटका झाला तर पुढे काय करायचे याचे पूर्ण नियोजन – या सर्व घटकांचा तपशीलवार विचार महाराजांनी त्या प्रसंगी करून ठेवला होता. शाहिस्तेखानाची पुण्यात लाल महालात कापलेली बोटे, पुढील काळात आग्र्याहून केलेली सुटका हे सुप्रसिद्ध ऐतिहासिक प्रसंगही छत्रपती शिवरायांच्या गुणांची साक्ष देतात.

स्वराज्याची सीमा दक्षिणेत तुंगभद्रेपर्यंत तर उत्तरेत सातपुड्यापर्यंत त्यांनी नेली होती. लढाईच्या काळात त्यांनी कधी रयतेला त्रास दिला नाही, की मराठी सैन्याने कुणाच्या स्त्रियांवर अत्याचार केला नाही. स्वत:च्या सैन्यासमोर त्यांनी आदर्श ध्येयवाद, नीतिमूल्ये व स्वराज्यनिष्ठा ठेवल्यामुळे मराठी सैन्यामध्ये सदैव आवेग, आवेश आणि उत्साहाचे वातावरण असायचे!

स्वराज्यनिष्ठा व पराक्रम यांसह सैन्य उभे करणे, विविध आक्रमणांना तोंड देणे, लढाया यशस्वी करत गडकोट काबीज करणे हे करत असतानाच, दुसर्‍या बाजूला शिवरायांची प्रशासनात्मक व रचनात्मक कामेही चालूच असत. शिवाजीराजांनी एक आदर्श शासनव्यवस्था उभी केली. सैन्याचा पगार केंद्रीय पद्धतीने देणे, सरदारांच्या बदल्या करणे, शेती व शेतसार्‍याबद्दल यंत्रणा लावणे, भूक्षेत्रानूसार शेतसारा निश्र्चित करणे, नैसर्गिक आपत्तींच्या काळात प्रसंगी शेतसारा माफ करणे अशा अनेक महत्त्वाच्या व्यवस्था त्या काळात सुरू झाल्या. ६ महिने स्वराज्याच्या सैन्यात नोकरी व ६ महिने शेती करणे ही शिलेदारी व्यवस्था सुरू करून महाराजांनी प्रजेला २ वेळची भाकरी मिळवण्याची आणि देशसेवा करण्याची संधी एकत्रितपणे दिली. त्यामुळे प्रजेला आर्थिक व सामाजिक सुरक्षितता प्राप्त झाली, तसेच स्वराज्याबद्दलची प्रजेची निष्ठा अधिकाधिक घट्ट होत गेली.

सूर्याजी काकडे, वाघोजी तुपे, बाजी पासलकर, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, … यांसारख्या हजारो मावळ्यांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून स्वराज्याचे स्वप्न साकार केले. त्यामागे फार मोठा ध्येयवाद होता, राष्ट्रवाद होता. आधुनिक शस्त्रास्त्रे, वेगवान घोडदळाचा विकास व कोकण किनारपट्टीकडून अरब, हपशी, सिद्धी, पोर्तुगीज यांपासून संरक्षण करण्यासाठी केलेली आरमाराची स्थापना या महत्त्वाच्या घटकांचेही त्यामध्ये योगदान होते. शत्रूचे मर्म आणि मर्यादा ओळखून त्यावर अचानकपणे हल्ला करून, वार्‍याच्या वेगाने चाल करून शत्रूची दाणादाण उडवून देण्याच्या अनोख्या तंत्रामुळे त्यांनी दिलेरखान, शाहिस्तेखान, अफझलखान व इतर अनेक सरदारांची पळताभुई थोडी केली .स्वराज्यावर चालून आलेल्या प्रत्येक आक्रमणापासून त्यांनी प्रजेचे रक्षण केले.

जगद्‌गुरू संत तुकाराम, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज ही तीन अलौकिक व्यक्तिमत्त्वे एकाच काळात महाराष्ट्रात वास्तव्यास होती. महाराष्ट्राचा तो सुवर्णकाळच! संत तुकाराम व छत्रपती शिवराय यांच्या भेटीचे उल्लेख इतिहासात आढळतात. (काही अभ्यासक या दोहोंची भेट १६४७ साली झाल्याचे सांगतात, तर काही अभ्यासक १६४९ मध्ये ही भेट झाल्याचा अंदाज व्यक्त करतात.) संत तुकारामांचे कीर्तन ऐकून मूळातच सत्‌प्रवृत्तीचे व आध्यात्मिक वृत्तीचे असणारे छत्रपती यांच्या मनात विरक्तीचे विचार प्रबळ झाले. पण संत तुकोबारायांनी छत्रपतींना `आम्ही जगाला उपदेश करावा। आपण क्षात्रधर्म सांभाळावा’ असा उपदेश केला. शिवरायांनी या आज्ञेचे पुढील काळात तंतोतंत पालन केले.

स्वराज्य खूप मोठे झाले होते. अशा वेळेसच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्र धर्माच्या पुनरुत्थानाचे बीजच ठरले. १६७४ सालच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये त्यांचा राज्याभिषेक काशीच्या गागाभट्टांकडून झाला. महाराज छत्रपती झाले. हा महाराष्ट्राच्या व भारताच्याही इतिहासातील एक सर्वोच्च पराक्रमाचा, आनंदाचा व अभिमानाचा क्षण होय!

छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा… असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी
- बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले,
- पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला,
- साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला,
- स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले;
- महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले,
- योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला,
- आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला;
- सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था… अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या.
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली;
- राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला.
- तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला.
या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात!

सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. महाराष्ट्र धर्म वाढवण्याची स्फूर्ती देते.

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून आले. याच काळात त्यांच्या तब्बेतीवरही फार परिणाम झाला. सततच्या मोहिमा, दगदग यामुळेच त्यांना ज्वराचा त्रास वाढतच गेला. यातच दि. ०३ एप्रिल, १६८० रोजी त्यांचा मृत्यू झाला. एका विशाल पर्वाचा अंत झाला.

मानवी देहाच्या मर्यादेत राहून शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती आणि इच्छाशक्ती यांच्या क्षमतेच्या योग्य वापराची अंतिम मर्यादा गाठून शौर्य, शील, नीतीमत्ता, दूरदृष्टी, धाडस, प्रसंगावधान यासारख्या अनेक सद्गुणांचा सर्वकालीन श्रेष्ठ आदर्श निर्माण करणारे शिवराय हे मनुष्याच्या अंगभूत शक्ती जाग्या होऊन योग्य कार्यात वापरल्या गेल्या तर काय चमत्कार घडतो याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. अलौकिक यश कसे मिळवावे हे शिकविणारा हा महाराष्ट्राचा देव महाराष्टीय लोकांच्या मनात अढळ आणि अमर झाला आहे.

शिवचरित्र हे महाराजांच्या मृत्यूपर्यंत थांबत नाही. पुढच्या काळात तब्बल ३० वर्षे या महाराष्ट्राला स्थिर व एकमेव असे नेतृत्व नसतानाही, स्वत: औरंगजेब महाराष्ट्रात आला असतानाही हे स्वराज्य समर्थपणे त्याच्याशी लढले व मुघल सम्राटाला इथेच, याच भूमीत प्राण ठेवावे लागले.

शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी समृद्ध, संपन्न असे ‘आंनदवनभुवन’ च निर्माण केले होते. त्या आनंदवनभुवनाचे वर्णन समर्थ रामदासांनी पुढील शब्दात केले आहे. हे काव्य म्हणजेच छत्रपतींनी पार पाडलेले ‘इतिकर्तव्य’ होय.

स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी, तीर्थासी तुळणा नाही।
आनंदवनभुवनी।।
त्रैलोक्य चालील्या फौजा, सौख्य बंध विमोचने, मोहीम मांडिली मोठी।
आनंदवनभुवनी।।
येथून वाढला धर्मु रमाधर्म समागमे , संतोष मांडला मोठा।
आनंदवनभुवनी।।
भक्तांसी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा, भक्तासी दिधले सर्वे।
आनंदवनभुवनी।।
येथूनी वाचती सर्वे ते ते सर्वत्र देखती, सामर्थ्य काय बोलावे।
आनंदवनभुवनी ।।
उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, जप-तप अनुष्ठाने
आनंदवनभुवनी।।
बुडाली सर्वही पापे, हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला।
आनंदवनभुवनी।।
आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।

स्वाइन फ्लुपासून अशी काळजी घ्या…

गेल्या दोन महिन्यांत अटोक्यात येण्याऐवजी स्वाइन फ्लूची साथ हातपाय पसरताना दिसते आहे. भारतात या साथीची तीव्रता कमी असली तरीही त्याबद्दल माहिती
असणे, उपाययोजना करणे कसे आवश्यक आहे
* स्वाइन फ्लूची साथ जगभरातील १०२ देशांत पसरली आहे.

* स्वाइन फ्लूच्या सध्याच्या उदेकाचे मूळ तज्ज्ञांच्या मते सप्टेंबर २००८मध्ये असावे. या काळात स्वाइन फ्लूचा एच वन एन वन विषाणू प्राथमिक अवस्थेत असावा, तो प्रभावशाली होत मग त्याची लागण मोठ्या प्रमाणात व्हायला लागली असावी.

* स्वाइन फ्लूची साथ असल्याचे ११ जून २००९ रोजी अधिकृत घोषित करण्यात आले. तर एकूण ७६ देशांत ३९ हजार ६२० व्यक्तींना या रोगाची लागण झाली असून १६७ मृत्यू झाल्याचे १७ जून रोजी डब्ल्यूएचओने जाहीर केले.

* या रोगाची लागण झालेल्या एकूण व्यक्ती आणि त्यामुळे झालेले मृत्यू याबद्दलच्या र्वल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) आणि युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल (इसीडीसी) या दोन संस्थांच्या आकडेवारीत थोडी तफावत आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार लागण झालेल्यांची संख्या ५२ हजार १६० आहे तर २३१जण मृत्यूमुखी पडले आहेत. इसीडीसीच्या मते ५२ हजार ९६२जणांना लागण झाली असून २३२जण मृत्यूमुखी पडले आहेत. काहींच्या मते मृतांचा आकडा २७२पर्यंत आहे.

* स्वाइन फ्लूचा पहिला जोर मेक्सिकोत होता. २४ मे २००९पर्यंत झालेल्या मृत्यूंत ९० टक्के या देशातले होते.

* अमेरिकेत स्वाइन फ्लूच्या २१ हजार ४४९ केसेस नोंदवल्या गेल्या असून ८७ मृत्यू झाले आहेत. या देशातील ११ राज्यांत मोठ्या प्रमाणावर, ६ राज्ये आणि पोतोर् रिकोत मध्यम प्रमाणात, कोलंबिया जिल्हा व १३ राज्यांत कमी प्रमाणात आणि २० राज्यांत अंशत: स्वाइन फ्लूच्या एच वन एन वन विषाणूने शिरकाव केला आहे.

* एरव्ही सर्वसाधारणपणे होणाऱ्या फ्लूचे थैमानही दुर्लक्षिण्यासारखे नाही. या ‘साध्या’ फ्लूमुळे जगभरात दरवषीर् अडीच ते पाच लाख लोक मृत्यूमुखी पडतात.

* भारतात आतापर्यंत स्वाइन फ्लूची लागण झालेल्या ६३ व्यक्ती आढळल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची ये जा असलेल्या मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्लीसारख्या शहरांत त्यांचे प्रमाण अधिक आहे. या रोगाचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी देशातल्या २२ आंतरराष्ट्रीय विमानतळांवर कडक तपासणी केली जात आहे. आतापर्यंत २२ लाख प्रवाशांना चाचण्यांतून जावे लागले असून त्यासाठी उभारलेल्या ७७ काऊंटरांवर २२४ डॉक्टर आणि ११२ पॅरामेडिकोजची नियुक्ती केली गेली आहे.

स्वाइन फ्लूची लक्षणे

सर्वसाधारण फ्लूप्रमाणे ताप, सदीर्खोकला, डोकेदुखी, सांधे व स्नायूंमध्ये वेदना, घशाला कोरड पडणे, हुडहुडी भरणे, थकवा, सतत नाक वाहणं, अतिसार आणि उलट्या होणे ही लक्षणे या फ्लूमध्येही दिसतात. त्यामुळे ‘असेल साधा फ्लू’ असे समजून दुर्लक्ष करू नका, लगेच डॉक्टरांकडे जा व मेडिकल तपासण्या करून घ्या. लहान मुलांमध्ये ओठ आणि त्वचा काळीनिळी पडणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, जोराचा श्वास लागणे, अति झोप येणे, अस्वस्थपणा वाढणे ही लक्षणे गंभीर स्वरूपाची आहेत. तर मोठ्या माणसांत श्वास तोकडा पडणे, छातीत अथवा ओटीपोटात वेदना होणे, झोपाळू वाटणे ही लक्षणे गंभीर आहेत. अर्थात लक्षणे गंभीर होण्याची वाट पाहायचीच कशाला?

स्वाइन फ्लू कसा पसरतो?

स्वाइन फ्लू झालेल्या व्यक्तीला झालेली सदीर् अथवा खोकला, त्याला येणाऱ्या शिंका यांचा संसर्ग झाल्यास अथवा दूषित वस्तूला/पृष्ठभागाला हात लागल्यानंतर मग त्याच हाताचा स्पर्श नाक अथवा तोंडाला झाल्यास संसर्ग होऊ शकतो. डुकराचे मटण खाल्ल्याने स्वाइन फ्लू होत नाही.

स्वाइन फ्लूवरील उपचार

स्वाइन फ्लूवर सर्वसाधारण फ्लूचेच उपचार केेले जातात. डॉक्टरी सल्ल्यानुसार विषाणू प्रतिबंधक (अँटीव्हायरल) औषधांचे डोस घ्यावे लागतात. आजाराच्या प्रमाणानुसार रोग्याला एकांतातही (क्वारंटाइन) देखरेखीखाली ठेवावे लागते. डब्ल्यूएचओच्या महासंचालक मार्गारेट चॅन यांच्या म्हणण्यानुसार २००९स्वाइन फ्लूवरील लशीचा पहिला डोस येण्यासाठी सप्टेंबर २००९ उजाडेल. तेव्हाही लस उपलब्ध झालीच तरी ती अतिशय मर्यादित प्रमाणात असल्याने साथीच्या व्याप्तीला कितपत पुरी पडेल याची शंकाच आहे. येत्या वर्षभरात स्वाइन फ्लूचे एच वन एन वन विषाणूंची संख्या प्रतिकारक्षमता अधिक वाढली असेल आणि या लशीला ते दाद देणार नाहीत अशी भीतीही व्यक्त होते आहे.

काही तज्ज्ञांच्या मते ज्यांना १९५७पूवीर् फ्लू होऊन गेला आहे, त्यांच्या शरीरात फ्लूच्या विषाणूंशी लढणाऱ्या अँटीबॉडीज अधिक प्रभावी असतात. अशा व्यक्तींना स्वाइन फ्लूची लागण होण्याची शक्यता कमी असते, अर्थात त्यांना लागण होणारच नाही अशी काही खात्री देता येत नाही.

स्वाइन फ्लूचा इतिहास

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (सीडीसी)वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार स्वाइन फ्लूची पहिली नोंद १९१८ साली झालेली दिसते. या साथीची लागण कोट्यवधी लोकांना झाली असल्याचा अंदाज त्यावेळच्या उपलब्ध असलेल्या नोंदीवरून काढता येतो. स्वाइन फ्लूच्या या भीषण थैमानात सुमारे १० कोटी लोकांना आपले जीव गमवावे लागले असल्याची माहिती मिळते. अर्थात या माहितीत काही विसंवादी आकडेवारीही दिसते. पण याच काळात एच वन एन वन या विषाणूची ओळख आधुनिक विज्ञानाला झाली. त्यानंतर १९७६ सालीही या रोगाचा उदेक झाल्याच्या नोंदी आहेत. १९७७ साली लागण झालेल्या रशियन फ्लूमध्येही एच वन एन वन विषाणूंचे अस्तित्व होते.

एच वन एन वनपासून बचावण्यासाठी

* खोकला किंवा शिंक आल्यास नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर ठेवा. वापरून झाल्यावर टिश्यू पेपर टाकून द्या.

* खोकला, शिंक आल्यावर नाक पुसून हात साबणाने स्वच्छ धुवा.

* डोळे, नाक, तोंड यांंना सतत हात लावू नका.

* आजारी व्यक्तींच्या निकट संपर्कात फार काळ राहू नका.

* फ्लू किंवा फ्लूसदृश रोगाने आजारी असाल तर लक्षणे दिसू लागल्यावर ७ दिवस अथवा लक्षणे गायब होण्याच्या २४ तासांपर्यंत घरातच थांबा. यामुळे अन्य लोकांना आजाराची लागण होणार नाही व साथ पसरणार नाही.

* खबरदारी घेण्यासंदर्भात आरोग्य खाते वेळोवेळी ज्या सूचना करेल किंवा आदेश देईल त्याचे तंतोतंत पालन करा.

Contact:
Mr.Pathan M.Y
Shivaji Colony,Shirval
Tal:Khandala,Dist:Satara
Mob:9890321698

किल्ले पुरंदर


सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाटावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे २४ कि. मी. धावून भुलेश्र्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगड वसलेला आहे. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याला चौफेर माच्या आहेत. किल्ल्याचे स्थान १८.२८ अंश अक्षांश व ७४.३३ अंश रेखांश वर स्थित आहे. किल्ला पुण्याच्या आग्रेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारूगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.

इतिहास : अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी मध्ये वाहते कर्‍हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा । असे पुरंदर किल्ल्याचे वर्णन केलेले आढळते. पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. या गावात यादवकालीन धाटणीचे महादेवाचे मंदिर आहे. यावरून हा किल्ला साधारण १००० ते १२०० वर्षांपूर्वीचा आहे असे अनुमान निघते. पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे ‘इंद्रनील पर्वत’. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकण्ठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्‍या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहंमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ. स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १६ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरी मध्ये असे आढळते. ‘तेव्हा पुरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभु म्हणून होता. त्याजबराबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठाण पाच हजार याखेरीज बैल वैगरे लोक ऐशी फौज गडास चौतर्फा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धोरंदर युद्ध जाहले. मावळे लोकांनी व खांसा मुरारबाजी यांनी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.’ मुरारबाजी देशपांडे चे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला, ‘अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावजितो.’ ऐसे बोलिता मुरारबाजी बोलिला ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?’ म्हणोन नीट खानावरी चालिला. खानावरी तलवरीचा वार करावा तो खानाने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला.’ खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध ‘पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना ावे लागले. त्यांची नावे अशी, १. पुरंदर २. रुद्रमाळ किंवा वज्रगड ३. कोंढाणा ४. रोहीडा ५. लोहगड ६. विसापूर ७. तुंग ८. तिकोना ९. प्रबळगड १०. माहुली ११. मनरंजन १२. कोहोज १३. कर्नाळा १४. सोनगड १५. पळसगड १६.भंडारगड १७. नरदुर्ग १८. मार्गगड १९. वसंतगड २०. नंगगड २१. अंकोला २२. खिरदुर्ग (सागरगड) २३. मानगड ८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव ‘आजमगड’ ठेवले. पुढे मराठांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ. स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.