धनत्रयोदशी
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दीव्यानी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लाउन त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.
तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
नरक चतुर्दशी
नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन नरकचतुर्दशी हा दिपावलीतील एक दिवस आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी या अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. `हिरण्यमयी, तेजस्वी, जीवनपोषक व चैतन्यमयी अशा लक्ष्मीला समोरच्या दाराने वाजत-गाजत आणून तिचे गृहात वास्तव्य करणे व अशा लक्ष्मीचे पूजन करणे म्हणजे लक्ष्मीपूजन.
लक्ष्मीपूजन
आश्विन अमावास्या - दिपावली दुसरा दिवस
या दिवशी प्रदोषकाळी(संध्याकाळी)लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे,शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते.
बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा - दिपावली , तिसरा दिवस)
बलिप्रतिपदेला बळीची पूजा करतात. बळीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्वरीकार्य म्हणून जनतेची सेवा केली. तो सात्त्विक वृत्तीचा व दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याचे हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्वरीकृपेमुळे तो देवत्वाला पोहचू शकतो, हे या उदाहरणावरून दिसून येते
भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीया -(यमद्वितिया) दिपावली , चौथा दिवस
हा दिवस म्हणजे शरद ऋतुतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.' आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस. या दिवशी बहिणीच्या घरी भाउ गोडधोड भोजन करतो आणी सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाउ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' टाकुन बहिणीचा सत्कार करतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment