Saturday, January 23, 2010

पंचांग

पंचांग हे भारतीय कालगणनेचे कोष्टक आहे. कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या पाच अंगांची माहिती ज्यात असते ते पंचांग.हा मुळचा संस्कृत शब्द आहे.(पंचानाम् अंगानां समाहार=ज्यात पाच अंगांचा समावेश असतो तो/ ती/ ते) यात सर्व ग्रहांचे योग वर्तवलेले असतात. पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक माहिती दिलेली असते. विवाह मुंज मुहूर्त वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, ज्योतिषांना लागणारी पहाटे ५.३० रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहीती, धार्मिक कृत्याविषयीचे निर्णय यात दिलेले असतात.

गर्भाधान संस्कार * बारसे * मुंज * विवाह * गुणमेलन * मुहूर्त * सण * वार * व्रत वैकल्ये * मकर संक्रांत * ग्रह उपासना * नवग्रह स्तोत्र * चंद्र व सूर्य ग्रहणे * ग्रहपीडा * दाने व जप * भूमीपूजन * पायाभरणी * गृहप्रवेश * वास्तुशांती * अशौच निर्णय * हवामान व पर्जन्यविचार * नांगरणी पेरणी पासून ते धान्य भरण्यापर्यंत * संत जयंत्या पुण्यतिथ्या * जत्रा * यात्रा * मासिक भविष्य * राजकीय व सामाजिक भविष्ये * धर्मशास्त्रीय शंका समाधान * ब्राह्मणातील शाखा उपशाखा * त्यांचे गोत्र वंशावळ * ९६ कुळी मराठा समाजातील वंश गोत्र देवक * ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेला ग्रहगती * रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती * गणिताची आकडेमोड वाचवणारी कोष्टके* ग्रह दशा * ग्रहांच्या अंतर्दशा * लग्नसाधन * नवमांश * अवकहडा चक्र * राशींचे घातचक्र इ. अशा अनेक गोष्टींचा माहिती कोष म्हणजे पंचांग.

तिथी
चंद्र व सूर्य यांच्यामध्ये बारा अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला तिथी म्हणतात. तिथीचा संबंध हा धार्मिक कृत्याशी असतो.

तिथि क्षय व वृद्धी
पंचांगात एखादी तिथी दोनदा आलेली असते तर एखाद्या तिथीचा क्षय झालेला असतो. याचे कारण चंद्र व पृथ्वी यांची परस्परावलंबी सापेक्ष गती कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते. सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते. ती त्या दिवसाची तिथी म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी तिथी सूर्योदयानंतर चालू होते व दुसर्‍या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते.त्यामुळे त्या तिथीचा क्षय होतो. एखादी तिथीबाबत ती दुसर्‍या दिवशीच्या सूर्योदयानंतर संपते त्यामुळे त्या तिथीची वृद्धी होते.

वार
होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एका अहोरात्रीचे २४ समान भाग केले असता त्यातील एक भाग म्हणजे होरा. हल्लीच्या तास या अर्थानेही हा भाग घेतला जातो. प्रत्येक होर्‍याला कुठलातरी ग्रह अधिपती असतो. त्याचे नांव वाराला दिले आहे. "उदयात उदयेंदु वारः" एका सुर्योदयापासुन दुसर्‍या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी तो वार असा या सूत्राचा अर्थ आहे. धार्मिक कारणांसाठी सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ केला जातो.

"आ मंदात शीघ्रपर्यंतम् होरेशा:" असे वारांचे सूत्र आहे. मंदग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत -- शनी, गुरू, मंगळ , रवी, शुक्र, बुध, चंद्र.

शनीवारी पहिला होरा अथवा तास हा शनीचा, पुढील तास गुरूचा, तिसरा मंगळाचा, चवथा रविचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा येतो असे २४ तास पूर्ण होतात. त्यानंतर दुसरा दिवस सुरू होतो तो पुढील म्हणजे रवीच्या होर्‍याने. म्हणून शनिवार नंतर रविवार येतो.

नक्षत्र
नक्षत्र म्हणजे अवकाशातील विशिष्ट पटटयातील ठळक तारका समूह. अवकाशगोलात ३६० अंशाचे बारा भाग पाडून राशी होतात. तसे २७ भाग पाडले तर २७ नक्षत्र होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा होतो. नक्षत्र म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूहाचे पट्टे. त्यातील ठळक तार्‍याला त्या नक्षत्राचा योगतारा म्हणतात.

योग
चंद्र व सूर्य यांच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास जेवढा कालावधी लागेल त्याला योग म्हणतात.असे एकूण २७ योग म्हणजे नक्षत्राइतकेच आहेत

करण
करण हा पण असाच कालावधी आहे तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण असे एकूण सात करणे आहेत. शिवाय अजून ४ करणे आहेत. एखाद्या तिथीचा पूर्वार्ध म्हणजे एक करण व उत्तरार्ध म्हणजे एक करण.

पक्ष
पंचांगाचे मुख्य दोन पक्ष सायन आणि निरयन.

महिने
१) चैत्र ३०/३१ दिवस २२ मार्च/ २१ मार्च (लिप इयर असताना)
२) वैशाख ३१ दिवस
३) ज्येष्ठ ३१ दिवस
४) आषाढ ३१ दिवस
५) श्रावण ३१ दिवस
६) भाद्रपद ३१ दिवस
७) आश्विन ३० दिवस
८) कार्तिक ३० दिवस
९) मार्गशीर्ष ३० दिवस
१०) पौष ३० दिवस
११) माघ ३० दिवस
१२) फाल्गुन ३० दिवस
राफेल चे एफमेरीज हे खर्‍या अर्थाचे सायन पंचांग असते. पाश्चात्य ज्योतिष हे सायनाधारित आहे. कालनिर्णय हे निरयन पंचांग आहे.

कालगणना
६० वर्षे (संवत्सरे) = १ संवत्सर चक्र
३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे = १ दिव्य वर्ष
१२०० दिव्य वर्षे = १ कलियुग
२४०० दिव्यवर्षे = १ द्वापार युग
३६०० दिव्य वर्षे= १ त्रेता युग
४८०० दिव्य वर्षे= १ कृत युग
४ युगे = १ महायुग
७१ महायुगे = १ मनु
१४ मनु= १ कल्प (ब्रह्मदेवाचा एक दिवस)
३६००० कल्प= ब्रह्मदेवाचे पुर्ण आयुष्य
१००० ब्रह्माची आयुष्ये=१ विष्णुची घटका
१००० विष्णुच्या घटिका म्हणजे १ शिवनिमिष
१००० शिवनिमिष = १ महामाया निमिष

No comments:

Post a Comment